पहिल्याच पावसात तुंबले पाणी ! वाघोदा- निंभोरा रस्त्यांची दुर्दशा वाघोदा ग्रामपंचायतच्या नियोजन शून्य कारभाराचे तीन तेरा.



वाघोदा;( करण तायडे)
 आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क :

       पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी शासन दरवर्षी ओढे-नाले, गावातील प्रमुख गटारी यांचे प्रवाह मोकळे करण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करते. कारण पावसाचे पाणी नागरिक वस्त्यांमध्ये घुसून,सामान्य जनतेला त्रास होता कामा नये. कारण यातून सामान्य जनतेला पावसाळ्यात असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे पावसाच्या सुरुवातीलाच गावातील प्रमुख गटारी, ओढे- नाले मोकळे केले जातात. परंतु याला अपवाद वाघोदा येथील ग्रामपंचायत ठरत आहे. नागरिकांनी वारंवार मागणी करून सुद्धा निंभोरा रोडवरील लेंडी नाला म्हणून ओळखला जाणारा भाग काल दिनांक 24 रोजी झालेल्या तूरळक पावसाच्या सरींनी सुद्धा तुडुंब भरला. त्यामुळे या नाल्याचे पाणी रस्त्यावर साचल्याने रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. थोड्या पावसातही परिसरातील रस्ते पाण्याखाली बुडाल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे अतिवृष्टी झाल्यास पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे. वाघोदा- निंभोरा या मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवरही पहिल्याच पावसात पाण्याची डबकी साचल्याने वाहनचालकांसह सामान्य नागरिक यांचे हाल होत आहे. वाघोदा - निंभोरा रस्त्यावर लेंडी नाल्यावर शनिवारी (दि.24) सर्वांत गंभीर स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे मागील दोन वर्षा अगोदर गावामध्ये जी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती तीच पुन्हा होते की काय? असे सर्वांना वाटत होते. कारण मागील वर्षी निर्माण झालेल्या पूरसदृश्य परिस्थितीचा चित्तथरारक अनुभव संपूर्ण वाघोदे गावाने अनुभवलेला आहे.

या ठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याने जवळपास 50 मीटर अंतराचा रस्ता पाण्याखाली बुडाला. त्यामुळे दुचाकीस्वारांना पदपथांचा आधार घ्यावा लागला. रस्त्यावर पाणी तुंबल्याने वाहतूक बंद पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने नागरिकांचे हाल होत आहे. याबाबत वाघोदा ग्रामपंचायत यांच्या कार्यभारामध्ये प्रचंड उदासीनता दिसून येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. संपूर्ण नाला हा कचरा, प्लास्टिक पन्नी, यांनी भरलेला असल्यानंतर सुद्धा ऐन पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा ग्रामपंचायतीने नाला मोकळा केलेला नाही. नाले सफाई बाबतीत प्रत्येक वर्षी ग्रामपंचायत दुर्लक्ष करत असते. त्यामुळे ऐन पावसाळ्यात गावामध्ये साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे सामान्य जनतेच्या खिशाला ही चाप बसतो. ग्रामपंचायतच्या या नियोजन शून्य व निर्लज्ज कारभारामुळे सामान्य जनतेला आर्थिक भूदंड सुद्धा सहन करावा लागत आहे. 
 वाघोदा- निंभोरा रस्त्यावर माती, गाळाच्या थरासह पाण्याची डबकी साचली आहेत. यामुळे वाहनचालक व नागरिकांना कसरत करावी लागत आहे. यामुळे रहिवाशांना मोठी कसरत करावी लागल्याचे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते गोविंदा लहासे यांनी सांगितले.

 पाऊस सुरू होण्याच्या अगोदर जर नालेसफाई झाली नाही तर हा नाला तुडुंब भरून नाल्याची संपूर्ण घाण परिसरातील घरांमध्ये शिरते वस्तीमध्ये शिरते.. त्यामुळे सामान्य जनतेच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नालेसफाई तात्काळ व्हावी, नाल्याचा प्रवाह बंद झाल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. पाणी वाहून जाण्यासाठी मार्गच नसल्याने जोरदार पाऊस झाल्यानंतर काही क्षणातच परिसरात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते.

– ईश्वर लहासे ,
रहिवासी, वाघोदा.

नागरी वस्त्यांत व रस्त्यांवर पाणी साचून नागरिकांचे हाल होऊ नयेत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना ग्रामपंचायत ने सुरू कराव्यात. पावसाळी गटारे तसेच ओढ्या-नाल्यांचे प्रवाह मोकळे करण्याचे काम ग्रामपंचायतीने तात्काळ सुरु करावे जेणेकरून भविष्यात मागील वर्षाप्रमाणे डेंगू,गॅस्ट्रो, मलेरिया व साथींचे रोग या सारख्या आजारांचा प्रादुर्भाव होता कामा नये .

- अमोल वाघ,
 स्थानिक रहिवाशी, वाघोदा

0/Post a Comment/Comments