चिनावल ( अजय भालेराव ) :
आवाज परिवर्तनाचा न्यूज नेटवर्क :
केळी कामगारांच्या सतर्कतेमुळे एका नवजात अर्भकाला जीवनदान मिळाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी रावेर तालुक्यातील चिनावल गावात घडली आहे.
आज सायंकाळी तुषार पाटील यांच्या शेतामध्ये केळी मजुरांना लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आल्याने केळी मजुरांनी शोधाशोध केली असता केळीच्या पानांमध्ये नवजात बालक असल्याचे दिसून आले. याबाबत तात्काळ चिनावलचे पोलीस पाटील निलेश पाटील यांना कळवले असता त्यांनी वेळेचे महत्त्व लक्षात घेता डॉ. जयंत पाटील यांना कळवले. चिनावल येथील डॉ. जयंत पाटील , राहुल टोके, पंकज नेमाडे यांनी लागलीच तेथे धाव घेत बालकाला तेथून उचलले, त्यावरती प्रथम दर्शनी प्राथमिक उपचार करून त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालय येथे अति दक्षता विभागात उपचारासाठी दाखल केले. सध्या तरी बालकाची प्रकृती स्थिर आहे. बालकाची प्रकृती उत्तम असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.
केळी कामगार ठरले खरे देवदूत...!
अवघ्या काही तासांपूर्वी जन्मलेल्या नवजात अर्भकास केळीच्या बागेत फेकून आईने त्याच्याशी प्रतारणा केल्याची घटना चिनावल गावात शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. मात्र 'देव तारी त्याला कोण मारी' या उक्तीप्रमाणे या बाळाच्या मदतीचा टाहो कानी पडल्यावर त्याला वाचविण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा केलेले केळी कामगार, त्याच्यासाठी देवदूतच ठरले आहेत.
बालकाला केळी बागेत टाकणाऱ्या मातापित्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत मातापित्यांच्या निर्दयी वागण्याच्या घटना वाढल्या आहेत. काही दिवसा अगोदरच निर्दयी आई -बापाने आपल्या नवजात बाळाला चालत्या गाडीतून फेकून दिल्याची घटना ताजी आहे.
Post a Comment